नांदेड : पूरग्रस्त टाकळी इथे बचावकार्याला सुरुवात झाली असून पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने या कामात अडचण येत आहे. माहूर जवळच्या धानोडा इथल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने माहूर-धनोडा रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. याच ठिकाणी टाकळी गावाच्या शिवारात काल सायंकाळपासून तिघेजण अडकलेले आहेत. भंडारी कुटुंबाचे नदी पलीकडे शेत आहे. ते काल शेतातील कामासाठी गेले असता पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. यामुळे त्यांनी शेतातील घराच्या पत्र्यावर आसरा घेतला. अखेर त्यांची सुटका करण्यासाठी नांदेड येथे असलेली 'एसडीआरएफ'ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. त्या तिघांना वाचविण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे.
सहस्रकुंड धबधब्याला रौद्र रूप : नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याने अक्राळविक्राळ रूप धारण केले असून धबधब्याचा हा रुद्रावतार पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. दरम्यान, या पुराच्या स्थितीत धबधब्याकडे जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सहस्त्रकुंड येथे सुरक्षेसाठी पोलीस दाखल झाले आहेत. पैनगंगा नदीला पूर आल्याने माहूर, किनवट मार्गावर सखल भागात पाणी साचले आहे. माहूरसह सहस्त्रकुंड धबधबा व इतर स्थळांना दर्शन व पर्यटनासाठी दोन दिवस पूर ओसरेपर्यंत न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पूरपीडित लोकांचे स्थलांतर : माहूर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठच्या गावात पूर आला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासनाच्या टीम जागोजागी तैनात करण्यात आल्या आहेत. किनवट धानोडा पुलावरुन पाणी वाहू लागले असून त्यामुळे याठिकाची वाहतूक बंद करण्यात आली आहे. किनवट येथील मोमिनपुरा वस्तीत पुराचे पाणी शिरले असून प्रशासनाकडून या ठिकाणच्या ८० लोकांचे उर्दू शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. तहसीलदार व टीम जागेवर हजर झाले असून लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे पैनगंगेला पूर आला आहे. या पुरामुळे माहूर जवळ टाकळी येथे पुरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी बचावपथके रवाना झाली आहेत. प्रशासनाची टीम पुरात अडकलेल्या वस्त्यांशी संपर्क ठेवून जागेवर हजर आहे.
'या' जिल्ह्यातही पावसाचा थैमान: सध्या राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात आणि नांदेड, हिंगोली, परभणी आणि पूर्व विदर्भात पावसाने थैमान घातला आहे. तसेच हवामान खात्याने आजही राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. किनवट, माहूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, देगलूर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
हेही वाचा: