नांदेड - जिल्ह्यामध्ये २४ जुलैपासून ४ ऑगस्टपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून, अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये जिल्ह्यात शुक्रवार २४ जुलै सकाळी ६ वाजेपासून ते मंगळवार ४ ऑगस्ट २०२० रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंधन घालण्यात आले आहेत.
सार्वजनिक परिसर किंवा परिसरच्या आसपास एकत्र येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाहीत.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नेमलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील.