नांदेड - बहीणीला भेटण्यासाठी दोन भाऊ दुचाकीने निघाले होते. मात्र, बहिणाला भेटण्याची इच्छा अपूर्णच राहील हे त्यांनाच माहित नव्हते. वाटेतच काळाने घातला आणि सर्वच उद्धवस्त झाले. बहिणीला भेटण्यास जाणाऱ्या गिरगाव येथील दोन भावंडांचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा मृत्यूशी झुंज देत आहे. निलेश इंगोले ( वय 22 ) असे मृताचे नाव आहे.
निलेश इंगोले व राजेश वाकडे हे दोघे सख्खे मावसभाऊ आहेत. दोघेही गिरगाव, ता. वसमत, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहेत. दोघे भाऊ अर्धापूर येथे असलेली बहीण प्रियंका ढवळे हिला भेटण्यासाठी जात होते. गिरगाव ते अर्धापूर मोटारसायकलने जात असताना त्यांच्या दुचाकीला वसमत-अर्धापूर रोडवर उमरी पाटीजवळ वेगातील वाहनाने धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. यातील निलेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरा मृत्यूशी झुंज देत आहे.
तीन वर्षांपूर्वीच झाला होता विवाह -
अपघातातील मयत निलेश इंगोलेचा तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये पूर्णा येथील भगवान दवने यांची मुलगी सपनासोबत विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच वसमत फाटा महामार्ग केंद्र अर्धापूरचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी. बसवंते, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल धुरपडे, राजीव धाडवे, कमलाकर जमदाडे, शिपाई वसंत शिनगारे आदींनी जखमींना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय नांदेड येथे नेले. अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनांविरुध्द गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.