नांदेड - शहरी भागातील विशेषत: झोपडपट्टी भागातील गरीब रुग्णांना उपचार मिळावे यासाठी शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत फिरते रुग्णालय सुरु केले आहे. मात्र, संबंधित कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे चार महिन्यापासून ही सेवा अडगळीत पडण्याच्या स्थितीत आहे.
वाहनासाठी इंधन पुरवठा, मुबलक औषधी पुरवठा उपलब्ध नसल्याने या फिरत्या रुग्णालयाची चाके रुतल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाने शहरी आणि ग्रामीण भागात फिरते रुग्णालय सुरु केले आहे. यासाठी प्रत्येक वाहनासोबत पाच कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यानंतर एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक औषध निर्माता, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ व एका चालकाचा समावेश आहे. या फिरत्या रुग्णालयामार्फत महिन्यातून 24 दिवस सेवा देण्यात येते. म्हणजेच या फिरत्या रुग्णालयाच्या 50 फेर्या होतात.
या रुग्णालयाच्यामार्फत गरीब रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र, मागील जवळपास चार महिन्यापासून ही सेवा डळमळीत झाली आहे. फिरत्या रुग्णालयाचे कंत्राट आदिती या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून मात्र मागील काही महिन्यापासून या सेवेकडे दुर्लक्ष होत आहे. फिरत्या रुग्णालयात मुबलक औषध पुरवठा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. या वाहनासाठी इंधन उपलब्ध नाही, तर वाहनात रक्त व अन्य तपासण्यांसाठी उपकरणे चालविण्यासंदर्भात वीज उपलब्ध नाही. त्यामुळे ही सेवा डळमळीत झाली आहे. त्यातच या फिरत्या रुग्णालयाच्या चालकाने याविषयी तक्रार केल्यानंतर त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले असल्याची माहिती आहे. फिरत्या रुग्णालयाचे कंत्राट कंपनीला देवून राष्ट्रीय आरोग्य अभियान ही सेवा योग्य प्रकारे चालते की नाही. याकडे लक्ष देत नसल्याने या सेवेचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे.