नांदेड - मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. या पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच अनेक गाड्याही रद्द झाल्या आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत गुरुवारी मुंबईहून निघणारी 'तपोवन एक्स्प्रेस' तसेच बुधवारी दादरहून निघणारी 'जनशताब्दी एक्स्प्रेस' रद्द करण्यात आली आहे . गुरुवारी जालन्याहून दादरला येण्यासाठीची 'जनशताब्दी एक्सप्रेस'ही रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा- मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्प, लोकल पकडण्यासाठी चाकरमान्यांचे हाल
तर बुधवारी निघालेली नांदेड ते मुंबई तपोवन एक्स्प्रेस ही नाशिक रोडपर्यंतच पोहोचली होती. नाशिक रोड ते मुंबईदरम्यान ती रद्द करण्यात आली. मुंबई ते नागपूर ही 'नंदीग्राम एक्स्प्रेस' मुंबई ते मनमाडदरम्यान रद्द करण्यात आली. तर नागपूर ते मुंबई ही बुधवारी संध्याकाळी निघालेली 'नंदीग्राम एक्स्प्रेस' मनमाडपर्यंतच धावणार आहे.
हेही वाचा- विरार ते वसई रेल्वे रुळावर पाणी; लोकल सेवा बंद
लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड गाडी ही बुधवारी दुपारी 12 वाजता सुटणार होती. ही गाडी पावसामुळे सायंकाळी 6 वाजता सुटली. मुंबई ते सिकंदराबाद ही छत्रपती शिवाजी टर्मिनसरून रात्री 9 वाजता निघणारी 'देवगिरी एक्स्प्रेस' मध्यरात्री 12.45 वाजता सुटणार आहे. तर पावसामुळे काही गाड्या पूर्णत: तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने कळवले आहे.