नांदेड - जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे तांडव सुरुच आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 51 रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. संचारबंदीच्या काळातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक हजाराच्या उंबरठ्यावर आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या अहवालानुसार रुग्णांची संख्या ही 986 वर पोहोचली आहे. तर, आज 15 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आज तिघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असून 49 एवढी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या 332 नमुने तपासणी अहवालापैकी पैकी 223 नमूने निगेटिव्ह आले आहेत. तर 51 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 986 झाली आहे. आजवर डिस्चार्ज झालेले रुग्ण 515 असून उपचार घेत असलेले रुग्ण हे 424 आहेत. सद्यस्थितीत प्रलंबित असलेल्या स्वॅबची संख्या 98 एवढी आहे. दररोज वाढत असलेल्या शहरी रुग्णसंख्येबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव मोठ्या झपाट्याने होत आहे. यामुळे, प्रशासनाची व नांदेडकरांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा टाळेबंदीत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही वाढ 23 जुलैच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे. या संबंधीचे आदेश रविवारी (दि. 19 जुलै) रात्रीच्या उशिरा काढण्यात आले.
जिल्ह्यातील कोरोना संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण : 1 लाख 48 हजार 256
घेतलेले स्वॅब : 10 हजार 324,
निगेटिव्ह स्वॅब : 8 हजार 498,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या : 51
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती : 986,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या : 5,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या : 52,
मृत्यूसंख्या : 49,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या : 515,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती : 423,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या : 98