नांदेड- लॉकडाऊनच्या १९व्या दिवशीदेखील जिल्ह्यात कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. आतापर्यंत पुण्याला तपासलेले १४५ घशांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर औरंगाबादच्या प्रयोगशाळेत गेल्या दोन दिवसात दोन टप्प्यात पाठवलेल्या सर्वच्या सर्व ४२ संशयितांच्या नमुनेदेखील निगेटिव्ह आले आहेत.
अद्यापपर्यंत १९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आजपर्यंतच्या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी महसूल, ग्रामविकास, आरोग्य व पोलीस दलासह जिल्ह्यातील जनतेला धन्यवाद दिले आहेत. विदेश प्रवास, दिल्ली मरकजहून परतलेल्या आणि कोरोना संबधित आजाराच्या समस्येवरील ४८२ संशयितांची नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यातील १९२ संशयितांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेतले. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत पाठवलेल्या १५० पैकी ५ नमुने निकषात बसत नसल्याने परत पाठवण्यात आले. उर्वरित १४५ नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला. शासनाने नांदेड जिल्हा औरंगाबादच्या प्रयोगशाळेला कोरोना तपासणीसाठी जोडला. तेथे किटची कमतरता होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी निघालेल्या पहिल्याच २५ नमुने तपासण्याचे अहवाल त्याच दिवशी दुपारी येणे अपेक्षित असताना तब्बल ४८ तासानंतर, शनिवारी सकाळी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हा आणखी एक दिवस धोक्यातून पुढे सरकला आहे. उर्वरित १७ जणांचे नमुने शुक्रवारी सकाळी पाठवले होते. त्यांचा अहवाल देखील शनिवारी दुपारीच हाती आला आहे. हे १७ अहवालदेखील निगेटिव्ह असल्याने साऱ्या जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.
क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेल्या ११० जणांना घरी पाठवण्यात आले असून त्यातील ४९ जणांना अजूनही निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यामध्ये रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या सात रुग्णांचा समावेश आहे. शासकीय रुग्णालयात तपासणी केलेल्या ४२६ जणांना घरीच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात ७० हजार ६२४ प्रवासी बाहेरगावाहून आले असून त्यांना त्यांच्या घरातच सक्तीने राहण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.