नांदेड - यावर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्याच प्रमाणे या आठवड्यात बुधवारी नांदेड तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहरातील हिंगोली गेट अंडर ब्रिज येथे पाणी साचले होते. या पाण्यात एक चारचाकी वाहन अडकल्याचा प्रकार समोर आला होता, सुदैवाने यातील सर्वजण बचावले. मात्र, या गंभीर प्रकारची दखल घेत मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मनपा अभियंत्यांची बैठक घेऊन सर्वांची झाडाझडती घेतली. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या २ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
महापालिका मान्सूनपूर्व काळात शहरातील सखल भागात पाणी साचणार नाही, नाले तुबंणार नाहीत, या दृष्टीने उपायोजना करत असते. मात्र, या उपाययोजना करूनही शहरातील कॅनॉल रोड येथे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. तर बुधवारी झालेल्या पावसामुळे शहरातील हिंगोली गेट अंडरब्रिज येथे पाणी तुबल्याने एक चारचाकी वाहन अडकले होते. वाहनातील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. दरम्यान येथील पाण्याचा निचरा करणारे डिझेल पंप बंद होते. त्यामुळे येथील पाण्याचा निचरा करता आला नाही. या मुळे मनपा आयुक्त डॉ. लहाने यांनी संबंधित अभियंत्यास याबाबत तात्काळ खुलासा करावा, अन्यथा कारवाईस सामोरे जावे, असा पवित्रा घेतला.
शहरामध्ये कोरोना महामारीचा विळखा वाढत आहे. शहरातील अनंदनगर, वसंतनगर, बाबानगर, कॅनॉल रोड, बाबानगर, शाहूनगर, बाफना रोड, नवीन कौठा भागात सखल भागात पाणी साचले होते. यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.