नांदेड - मुंबई येथील काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत दगाफटका केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सत्कार सोहळ्यात खुद्द राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी उपस्थिती लावली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याच जिल्ह्यात उघडपणे राष्ट्रवादीने भाजपशी संधान बांधल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रताप पाटील यांच्या मूळ गावी कळका (ता.कंधार) येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खुद्द अशोक चव्हाण हे निवडणूक रिंगणात असतानाही राष्ट्रवादीने उघडपणे भाजपचा प्रचार केल्याचे दिसून आले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित खासदारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे घर गाठून त्यांचे आभार मानले. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याच्या चर्चेला अधिकृत पुष्टीही मिळाली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीने मदत केली नसल्याचा आरोप केला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी नांदेडमध्ये हे चित्र दिसून आले. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि चंद्रकांत पाटील मांडीला मांडी लावून बसले होते. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चित्र पुन्हा काहीतरी वेगळे असणार हे यातून सूचित केले जात आहे.
काँग्रेसने विधानसभेची तयारी सुरू केली असताना स्वबळावर लढण्याचा नेत्यांचा सूर असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेसला राष्ट्रवादीने मदत केली नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. तर काँग्रेसने प्रत्येक ठिकाणी आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादीला मदत केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे ऐन विधानसभेपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाने वेगळीच दिशा घेतली असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेते भाजपमध्ये आले तर नवल नाही.
या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे जाहीर केले. तसेच चिखलीकर यांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हे उघडपणे भाजपच्या स्टेजवर गेल्यामुळे आगामी काळात भोकर मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात, असे तर्क-वितर्क राजकीय जाणकार लावत आहेत.