नांदेड - आभाळाला हात पोहचेल की काय इतक्या उंचावर इथे रेणुका मातेचे वास्तव आहे. उंच डोंगर आणि घनदाट हिरवळ हे नयनरम्य दृश्य पाहून भक्तांचे मन प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही. रेणुका मातेच्या या मंदिरात जाण्यासाठी घनदाट जंगलाच्या घाटातून प्रवास करावा लागतो. त्यानंतर शेकडो पायऱ्या चढून गेल्यावर मातेचे दर्शन होते. देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ म्हणून तीर्थक्षेत्र माहूरची ओळख आहे. पौराणिक ग्रंथात कोरी भूमी असा उल्लेख असलेल्या या माहुरला निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. यंदा पाऊसही मनसोक्त बरसला. पावसामुळे निसर्गाने इथे हिरव्या रंगाची मुक्त हस्ते उधळण केली. त्यातून हिरवा शालू नेसल्यासारखी इथली धरती नटली आहे. 'ईटीव्ही भारत' च्या माध्यमातून जाणून घेऊया माहूरगडचे महत्व!
साडेतीन शक्तीपिठातील मूळ पीठ -
देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी एक मूळ पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरील रेणुका देवी आहे. माहूरची रेणुकादेवी ही जमदग्नीची पत्नी आणि श्री परशुरामची माता होती. प्राचीन काळी भागीरथीच्या तीरावर रेणू नावाचा इक्ष्वाकुवंशीय राजा होता. रेणू राज्याने कन्याकामेश्ठी यज्ञ करून शंकर-पार्वतीला प्रसन्न केले असता यज्ञाच्या अग्नीतून ही कन्या प्रकट झाली. म्हणून तीचे नाव रेणुका असे ठेवले. खरे पाहता, तिचे पाळण्यातील नाव कमळी आहे. स्वयंवरावेळी सर्व राजांना अव्हेरून तपस्वी जमदग्नी ऋषींना तिने वरले आहे, अशी आख्यायिका आहे. रेणुकादेवी ही राजकन्या, ऋषीपत्नी आणि वीरमाता या त्रिविध भूमिका, रूपासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाटकच्या यल्लमा या नावाने तिची पूजा अर्चना केली जाते. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी साडेतीन शक्तिपीठे आहेत. त्यातच माहूर ओळख ही मूळपीठ अशी आहे.
इतिहासात प्रथमच भक्ताविना माहूरचा नवरात्रोत्सव -
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळपीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्री महोत्सवात लाखो भाविक येत असतात. महोत्सवाच्या 10 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यासह देशभरातून दररोज लाखो भाविक रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर येथे येत असतात. यामध्ये ललित पंचमी, नवरात्रीतील मंगळवार, शुक्रवार व रविवार या दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. अश्विन पोर्णिमेला तर भाविकांची प्रचंड गर्दी असते. शिवाय, घटस्थापनेपूर्वी दिपज्योत नेण्यासाठीही युवकांची मोठी गर्दी होते. इतिहासात प्रथमच माहूर गडावर भक्ताविना नवरात्रोत्सव होत आहे. यापूर्वी अगदी प्लेगच्या साथीच्या वेळी माहुरचे मंदिर बंद नव्हते. कारण, त्यावेळी प्लेगचा प्रादुर्भाव या प्रांतात फारसा झाला नव्हता. मात्र, यंदा कोरोनामुळे सलग सहा महिन्यापासून मंदिर बंद असल्याने भाविक मातेच्या दर्शनासह इथल्या निसर्ग सौंदर्याला मुकत आहेत.
पुजाऱ्यांच्या उपस्थितीत झाली घटस्थापना -
माहुरमध्ये शनिवारी घटस्थापना करण्यात आली. 'उदे गं अंबे उदे'चा जयघोष करत पुजाऱ्यांच्या उपस्थितीत घट स्थापना करण्यात आली. यावेळी प्रथेप्रमाणे कुमारीकेचे पूजन करण्यात आले. त्या नंतर पुजाऱ्यांनी देवीची आरती करत घटस्थापना झाल्याचे सांगितले. पुढचे नऊ दिवस माहूर गडावर पुजाऱ्यांच्याच हस्ते सर्व विधी होणार आहेत. घटस्थापनेची लगबग असली तरीही भक्तांविना माहूर गडाच्या परिसरात शुकशुकाट जाणवत होता. दरवर्षी घटस्थापनेला लाखो भाविक माहूरला येत असतात. मात्र, कोरोना संसर्गामुळे मंदिर बंद असल्याने भक्तांचा नाईलाज झाला आहे. भाविक रेणुकादेवीलाच कोरोनामुक्तीसाठी साकडे घालत आहेत.