नांदेड - प्रदुषणमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात नैसर्गिक गॅस पाईपलाईनचे जाळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या या महत्वकांक्षी प्रकल्पात नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे. शहरासह जिल्ह्यातील 8 लाख कुटुंबांना नैसर्गिक गॅस पाईपलाईनने जोडण्यासाठी 1200 कोटी रुपयांच्या प्रकल्पास तत्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकने नांदेड शहराला भेट देवून पाहणी केली असल्याची माहिती नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.
केंद्र सरकारच्या नॅचरल गॅस प्रकल्प योजनेत नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून केली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडला हा प्रकल्प मंजूर करण्यात यावा, अशी शिफारसही केंद्राकडे केली होती. गेल्या दोन-तीन वर्षाच्या कालावधीत खासदार या नात्याने तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान व विद्यमान पेट्रोलियम मंत्री सरदार हरदीपसिंघ पूरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन या प्रकल्पास मान्यता मिळवून घेण्यात आपणास यश आले आहे, असा दावा खासदार चिखलीकर यांनी केला आहे.
मुलभूत सुविधांविषयी चर्चा व प्रकल्पस्थळाची पाहणी
नांदेडचा गॅस पाईपलाईन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पीएमजीआरबीकडून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. एमएनजीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकासह वरिष्ठ अधिकार्यांची एक टीम शुक्रवार 4 मार्च 2022 रोजी नांदेड शहरात दाखल होवून प्रकल्पाला लागणार्या मुलभूत सुविधांविषयी चर्चा करुन प्रकल्पस्थळाची पाहणी केली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आठ वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे.
8 लाख कुटुंबियांना थेट घरगुत्ती गॅस पाईपलाईनव्दारे जोडले जाणार
नांदेड शहरासह लोकसभा मतदारसंघातील 8 लाख कुटुंबियांना थेट घरगुत्ती गॅस पाईपलाईनव्दारे जोडले जाणार आहे. बुलढाणा ते नांदेड 270 कि.मी.ची मुख्य पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुकास्तरापर्यंत गॅस पाईपलाईनव्दारे जोडले जाणार आहे. नांदेड गॅस प्रकल्पाच्या डिटेल फिजीबील्टी रिपोर्टच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर हे स्वच्छ, स्वस्त आणि पर्यावरणास अनुकूल इंधन म्हणून घरगुत्ती वापरासह औद्योगीक क्षेत्रालाही गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे. वाहन इंधन म्हणूनही सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु करण्यासाठी जिल्ह्यात 170 सीएनजी पंपची उभारणी करण्याचा समावेशही या प्रकल्पात करण्यात आला आहे.
हेही वाचा - PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण