नांदेड - जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची शेती युवासेनेने दत्तक घेतली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून युवासेनेने हा उपक्रम राबवला आहे. तसेच स्वतः युवासेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी हातात नांगर धरून या शेतकऱ्याच्या शिवारात पेरणी केली.
खुरगाव येथील रमाकांत लेंडाळे या युवा शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. मृत रमाकांतचे वृद्ध वडील जयराम लेंडाळे हे आर्थिक अडचणीत असल्याने त्यांची शेती पडीक होती. युवासेनेचे जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांना ही बाब समजताच पावडे कुटुंबाच्या मदतीला ते धावून आले. यावर्षी या कुटुंबाच्या शेतीला लागणारे बी-बियाणे, खते कीटकनाशके यासह इतर सर्व साहित्य युवासेना पुरवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांनी सांगितले.
हेही वाचा... 'आम्हालाही मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगायचंय'
युवासेनेकडून आज या शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खत देण्यात आले आहे. युवासेनेने त्यांच्या शेतात आज पेरणी करण्यास सुरुवात केली. हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुदृढ बनावे, यासाठी वर्षभर सर्वतोपरी मदत करणार असल्याचे पावडे यांनी सांगितले.