नांदेड - मुंबई ते मनमाड धावणाऱ्या राजाराणी एक्सप्रेसला नांदेडपर्यंत वाढवण्यात आले आहे. खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. या नूतन रेल्वेबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आदेश काढले असून त्याची एक प्रत खासदार चिखलीकरांना पाठवली आहे.
हेही वाचा - 'सत्तेत असताना 'सामना' वाचला असता, तर सत्ताही वाचली असती'
नांदेडहून मुंबईकरता थेट आणि स्वतंत्र रेल्वे असावी अशी अनेक दिवस लोक मागणी करत होते. नांदेडहून नंदीग्राम, देवगिरी आणि तपोवन या तीन रेल्वे मुंबईच्या दिशेने जातात. यातील तपोवन एक्सप्रेसने प्रवासाठी 1 दिवस लागतो. नंदीग्राम एक्सप्रेस नागपूरहुन निघते तर देवगिरी एक्सप्रेस हैदराबादहून निघते. त्यामुळे रात्रीतून मुंबई गाठण्यासाठी या दोन रेल्वेंशिवाय प्रवाशांसाठी अन्य कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता.
खासदार चिखलीकर यांनी रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही मागणी मान्य केली. मुंबई ते मनमाड धावणारी राजाराणी एक्सप्रेस (रेल्वे क्रमांक: 22101/22102) ही नांदेडपर्यंत धावणार आहे. ही रेल्वे सेवा दररोज असणार आहे. सांयकाळी नऊच्या आसपास नांदेडहून रेल्वे निघणार असून सकाळच्या सत्रात लवकर मुंबईला पोहोचणार आहे. तसेच मुंबईहून सांयकाळी निघून सकाळी नांदेडला ही रेल्वे पोहोचणार आहे. येत्या आठवडाभरात अधिकृत वेळापत्रक जाहीर होणार आहे. या रेल्वेचे वेळापत्रक हे सर्वांना सोयीस्कर होईल असेच करण्यावर भर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या नूतन रेल्वेचे खासदार चिखलीकर यांनी स्वागत करत रेल्वेमंत्र्याचे आभार मानले आहेत. यामुळे नांदेडसह मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार चिखलीकर यांनी सातत्याने या रेल्वेच्या मागणीसाठी प्रयत्न केल्याने प्रवाशी संघटनांनी खासदारांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा - नाट्यसृष्टीतील धगधगतं पर्व शांत झालं - किरण यज्ञोपवीत