नांदेड - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “हर घर तिरंगा’ ( Har Ghar Tiranga Campaign ) उपक्रमाला लोकसहभागाच्या व्यापक चळवळीचा एक नवा मापदंड निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला या अमृतमहोत्सवी वर्षाचा आनंद व आत्मिक समाधान घेता यावे. या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात जि.प. कर्मचारी आणि बचत गटांतर्फे तिरंगा पोहोचवण्यात येणार असल्याचे ठरले आहे.
दारिद्र्यरेषेखाली व्यक्तींना तिरंगा देणार - बैठकीला जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, उद्योजक, व्यापारी व इतर प्रतिनिधींच्या सहमतीने “हर घर तिरंगा’ अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ( Har Ghar Tiranga Campaign ) जिल्हा परिषदेचे 11 हजार 900 कर्मचारी आहेत. प्रत्येक कर्मचारी आपल्या वैयक्तिक घरासह गरजू 3 व्यक्तींना तिरंगा देईल. एकट्या जिल्हा परिषदेमधून जवळपास 50 हजार गरीब, दारिद्र्यरेषेखाली व्यक्तींना आपला तिरंगा देण्यात येणार आहे.
विद्यार्थी योगदान देणार - तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जि.प.चे सर्व आजी- माजी लोकप्रतिनिधी या उपक्रमात सहभागासाठी स्वयंस्फूर्तीने तत्पर आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व शाळा, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी योगदान देतील, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी व्यक्त केला. ( Har Ghar Tiranga Campaign ) बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार, सौम्या शर्मा, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले व सर्व विभागांचे प्रमुख आदींची उपस्थिती होती.
बचत गटांतर्फे 79 हजार कुटुंबांपर्यंत तिरंगा - जिल्ह्यात 16 नगरपरिषदा असून या क्षेत्रातील 121 बचत गटांमार्फत सुमारे 79 हजार कुटुंबांपर्यंत तिरंगा पोहोचवण्याचे नियोजन आहे. महानगरपालिका क्षेत्रात 1 हजारपेक्षा अधिक बचत गट आहेत. सर्व बचत गटांना सहभागी करून घेण्याबाबत माविमतर्फे नियोजन केल्याचे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने म्हणाले.
हेही वाचा - Coronavirus New Cases Today : देशात 24 तासात 20557 कोरोना रुग्णांची नोंद, तर 40 रुग्णांचा मृत्यू