नांदेड - लोहा तालुक्यातील सोनखेड येथील एका पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. लैंगिक अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, या मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जवळपास दीड तास चाललेल्या या रास्तारोकोमुळे वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा... नांदेडमध्ये पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार, अज्ञात नराधमावर गुन्हा दाखल
सुग्रीव भुजंग मोरे (२८) असे आरोपीचे नाव आहे. त्याला कंधारच्या अतिरिक्त न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तुळजापूर-नागपूर नॅशनल हायवेवर रास्तारोको करण्यात आला. सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सोनखेड गावातील ग्रामस्थांनी या रास्तारोकोत सहभाग घेतला होता.आंदोलकांकडून तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी निवेदन स्वीकारले. तसेच सोनखेड घटनेच्या निषेधार्थ भोपाळवाडी, कलंबर, विष्णुपुरी व परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
हेही वाचा... सोनखेड अत्याचार प्रकरणातील नराधमास अटक, नागरिकांकडून फाशीची मागणी