नांदेड - अनेक वर्षांपासून गोदावरीच्या पात्रात राजरोसपणे सुरू असलेला अवैध वाळू उपसा प्रकरणात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कारवाई सुरु केली आहे. मुदखेड व लोहा तालुक्याच्या हद्दीतील गोदावरीच्या पात्रात सुरू असलेले सक्शन पंप उद्ध्वस्त केल्यानंतर आता भोकर तालुक्यातील वासरी येथील २ वाळू तस्करीच्या बोट जिलेटिन स्फोटाद्वारे उडवून नष्ट केल्या आहेत.
भोकरचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार दिनेश झापले, नायब तहसिलदार संजय सोलंकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. सोमवारी दुपारी दीड वाजता एक बोट नष्ट केल्यानंतर याच परिसरात असलेली दुसरी बोट दुपारी साडेतीन वाजता नष्ट करण्यात आली. मुदखेड तालुक्यातील मौजे वासरी येथील गोदावरी नदीकाठी अवैधरित्या सक्शन पंपाद्वारे नदीमधून वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली २२ तारखेला तहसीलदार दिनेश झापले, नायब तहसीलदार संजय सोलंकर व संजय भोसीकर तसेच पोलीस निरीक्षक माछरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मुदखेड तालुक्यात वासरीसह खुजडा, टाकळी, शंखतीर्थ, आमदुरा, देवापुर , येळी महाटी, माळकौठा या गावात गोदावरीच्या पात्रातुन वाळू चोरीचे प्रकार होत आहेत. रात्रीच्या सुमारास वाळू चोरी होत असून प्रशासनातील संबंधित अधिकाऱयांना याबाबतची माहिती असतानाही ते बघ्याची भूमिका घेत आहेत. निवडणूक काळात अवैध वाळू उपसा करुन याच परिसरात नवीन वाळूचे साठवन केल्याचे चित्र दिसून येते आहे.
काही भागात अवैध वाळूची चोरी जे. सी. बी. मशीनद्वारे करण्यात आली आहे. नांदेड रोडवर नवीन वाळूचे मोठ साठे दिसून आले. मुदखेडला तहसीलदार दिनेश झापले हे रुजू झाल्यानंतर ही अवैध वाळूची प्रथमच मोठी कारवाई झाली आहे.