नांदेड - सध्या राज्यात भीषण दुष्काळ आहे. अशाही स्थितीत अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या पाण्यावर पिके जगवली आहेत. मात्र, रेतीमाफियांमुळे शेतकरी देशोधडीला लागल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. वाळूमाफियांनी नदी पात्रातील शेतकऱ्यांच्या विहिरी बुजवून टाकल्या आणि वीज पंप काढून फेकून दिले आहेत.
उमरी तालुक्यातील माहाटी इथल्या रेतीच्या धक्क्यावर प्रचंड रेतीचा उपसा सुरू आहे. बेकायदेशीरपणे जेसीबी मशीनचा वापर करत रात्रंदिवस इथून प्रचंड प्रमाणात रेती काढली जात आहे. रेतीचा उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नदी पात्रातील असलेल्या छोट्या- छोट्या विहिरी रेतीमाफियांनी जबरदस्तीने बुजून टाकल्या आहेत. रेतीमाफियांनी दादागिरी आणि जीवे मारण्याच्या धमक्या देऊन शेतकऱ्यांच्या नदीपात्रातील मोटारी काढून फेकल्या आहेत. या प्रकारामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतक्या भीषण दुष्काळात मोठ्या कष्टाने जगवलेला ऊस नष्ट होत आहे.
या शेतकऱ्यांनी रेती माफियांच्या दादागिरीची तक्रार प्रशासनाकडे केली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रेती माफियांना एक अधिकारी मदत करत असल्याने त्याला शासकीय पाठबळ मिळत आहे. मुळात दोन हजार ८७१ ब्रास रेतीचा उपसा करावा यासाठी या रेती घाटाचा लिलाव करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात या घाटावरून आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक ब्रास रेती काढून नेल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. रेतीच्या या अवैध उपशामुळे नदीपात्रात असलेले पाणी ही संपले आहे. त्यातच आता पावसाळा लांबत चालल्याने ऊसाचे पीक वाचवावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
रेती माफियाला जिल्हा प्रशासनाने मोकाट सोडल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराची औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्तांनी दखल घेतली आहे. मात्र, नांदेड आणि उमरीच्या प्रशासनाने डोळेझाक केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रेतीच्या घाटातून प्रशासनाला मिळणाऱ्या महसुलातून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आता होत आहे. नांदेडच्या प्रशासनाकडून काहीच अपेक्षा नसल्याने नुकसानग्रस्त शेतकरी महसूलमंत्र्याच्या भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.