नांदेड - धुळ्यात पोलिसांनी गुरुवारी ( 28 एप्रिल ) 90 तलवारी जप्त केल्या होत्या. त्यानंतर नांदेडमधील शिवाजी नगर पोलिसांच्या डीबी पथकाने कारवाई करत 25 तलवारीचा मोठा साठा हस्तगत केला आहे. दरम्यान, सदर तलवारी बॉक्समध्ये भरून छुप्या मार्गाने रिक्षामध्ये टाकून नेत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले ( Nanded Police Seized Swords ) आहे.
शहराच्या विविध भागात धरपकड - धुळे, औरंगाबाद येथे सापडलेल्या तलवारींच्या साठ्यामुळे राज्यभरात राजकीय - वातावरण तापलेले असतानाच नांदेडमध्येही पुन्हा मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. शहराच्या विविध भागात पोलिसांच्या वतीने सराईत गुन्हेगारांची धरपकड, तपासणी मोहीम सुरू आहे. यादरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहूळे यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी गोकुळनगर भागात कारवाई करून एका रिक्षासह पंचवीस तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली ( Nanded Police Arrested Two Person ) आहे.
विविध भागात नाकाबंदी - शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड पोलीस दलाच्या वतीने विविध भागात नाकाबंदी, धरपकड, अवैध धंद्यावर आळा बसविण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे.
बेकायदेशीररित्या तलवारी घेऊन जाताना ताब्यात - गेल्या काही दिवसांत जवळपास 52 गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून विविध घातक शस्त्र नांदेड पोलिसांच्या वतीने जप्त करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, त्यांनी गोकुळनगर भागात सापळा लावला. गोकुळनगर भागातील रोड नंबर 26 वर ऑटो क्रमांक ( एमएच २६ - एन -५२२४ ) ह्यात विना परवाना, बेकायदेशीररित्या तलवारी घेऊन जाताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडून पंचवीस तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
हेही वाचा - Interest Free Crop Loan : खुशखबर, शेतकऱ्यांना मिळणार तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज