नांदेड- जिल्ह्यासह शेजारील तेलंगणा राज्यात अनेक धाडसी दरोडे टाकणाऱ्या कुख्यात दरोडेखोरास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. अटक केलेल्या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात ३० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
विविध पोलीस ठाण्यात चोरी, दरोडे यासारखे अनेक गुन्हे नोंद असलेला हिस्ट्रीशिटर गुन्हेगार लक्ष्मण पिराजी मेकर जुन्या नांदेडात एका विवाह समारंभात आल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग भारती यांचे पथक चौफाळा भागात पोहोचले. यावेळी कुख्यात दरोडेखोर लक्ष्मण मेकर (रा. नांदुसा ता.अर्धापूर) हा तिथे होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने गोदावरी नदीच्या दिशेने धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करुन त्यास नावघाट पुलालगतच्या परिसरातून ताब्यात घेतले.
लक्ष्मण मेकर विरुद्ध लिंबगाव, भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचे १५ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तेलंगणातही त्याच्याविरुद्ध १४ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी या आरोपीस भोकर येथे दरोडा प्रकरणी अटक झाली होती. तेलंगणा पोलिसांनी हस्तांतरण वारंटद्वारे त्यास ताब्यात घेतले होते. यानंतर तो जामिनावर सुटला होता. तेव्हापासून महाराष्ट्र पोलीस त्याच्या मागावर होते.