नांदेड - राज्यभर गाजलेल्या पोलीस भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रवीण भटकरच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवीण भटकर हे फरार होते. नांदेडसह चार जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे तपासात उघडकीस आले होते.
या प्रकरणात नांदेड अन् पुण्यात गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. आता नांदेड पोलीस भटकरचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रवीण भटकर याने स्थापन केलेली कंपनी नांदेडमध्ये पोलीस भरतीचे काम पाहत होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी या भरती घोटाळ्याचे भिंग फोडले.अनेक उमेदवारांना एकसारखे गुण मिळाल्यामुळे त्यांना संशय आला होता. त्यानंतर भटकरने चार जिल्ह्यातील भरतीमध्ये अशाच प्रकारे पैसे घेवून उमेदवारांना नोकरीला लावल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यासह २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.२० पैकी १२ आरोपींना नांदेड पोलिसांनी अटक केली होती.परंतु मुख्य सूत्रधार प्रवीण भटकर हा गेल्या अनेक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तर दुसरीकडे या प्रकरणातील एकाही आरोपीचा अद्याप जामीन झाला नव्हता. भटकर याच्याविरोधात पुणे येथेही गुन्हा नोंद होता. दोन दिवसांपूर्वी भटकर पुणे पोलिसांच्या हाती लागला.सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याचा ताबा मिळविण्यासाठी नांदेड पोलीस पुण्याकडे रवाना झाले आहेत. २९ जूनला याची कोठडी संपणार आहे.
त्यानंतरच त्याला नांदेड पोलिसांच्या ताब्यात देण्याची शक्यता आहे.