नांदेड- कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांप्रकरणी अनेक आंदोलनानंतरही तोडगा न निघाल्याने अखेर महापालिकेचे कर्मचारी ३० जुलैपासून बेमुदत संपावर जात आहेत. सोमवारी झालेल्या धरणे आंदोलनानंतर ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महापालिकेत कायम आणि कंत्राटी मजूर, वाहनचालकांसह सफाई कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत.
या मागण्यांच्या सोडवणुकीसाठी मनपा कामगार कर्मचारी युनियनतर्फे राज्यस्तरावर पाठपुरावा केला जात आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक स्तरावर कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रशासनाने पाच ते सहा बैठका घेतल्या. प्रशासनावर विश्वास ठेवून कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुढे ढकलले. मात्र कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक अद्यापही झाली नाही. त्यामुळे ३० जुलै पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ.गणेश शिंगे यांनी सांगितले.
आंदोलनात मनपातील कायम पात्र कर्मचाऱ्यांना रिक्त झालेल्या पदावर नियमाप्रमाणे पदोत्रती द्यावी, राजपत्रात प्रसिद्ध झालेला सेवा प्रवेश नियम आधारभूत मानून आवश्यक त्या सुधारणेसह मनपा कर्मचारी आकृतिबंधाचा संयुक्त प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर करावा, जे कर्मचारी सार्वजनिक सण, राष्ट्रीय सण या सुट्यामध्येही काम करतात, त्या कर्मचाऱ्यांना सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा अतिरिक्त मोबदला द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
सोमवारी झालेल्या बैठकीत मनपा कर्मचारी युनियनचे कॉ. शिंगे, कॉ. बी. के. पांचाळ, दयानंद गायकवाड, जमील अहमद, सुनील लोखंडे, आनंदा खानसोळे, ओमप्रकाश पिटलोड, गणेश नारपोजे, नितीत तोरणेकर आदी सहभागी होते.