नांदेड - तापत्या उन्हात यंदाची नांदेड मतदारसंघाची निवडणूक चांगलीच तापली आहे. नांदेड जरी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी यावेळेस अशोक चव्हाणांची चांगलीच दमछाक झाली. अशोक चव्हाण यांच्यापुढे भाजपने तगडे आव्हान उभे केले आहे. तर वंचित बहुजन आघाडीनेही प्रचारात चांगलाच वेग घेतला. या तिरंगी लढतीत नेमके कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. नांदेड मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात आहेत.
२०१४ ला मोदी लाटेतही गड राखणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची होमपीच म्हणून नांदेड जिल्हा ओळखला जातो. त्यांची मतदारांवर चांगली पकड आहे. तरीही त्यांनी रिस्क न घेता नांदेड जिल्ह्यात पायात भिंगरी बांधून प्रचार केला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशातील व राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते प्रचारासाठी बोलविले होते. त्यामुळे काँग्रेसचने चांगले वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असला तरी भाजपने पहिल्यांदाच प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यासारखा एक तगडा उमेदवार देऊन आव्हान उभे केले आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन सभा घेतल्या. देशातील व राज्यातील अनेक मातब्बर नेते प्रचारात उतरले होते. भाजप उमेदवाराच्या मागे राज्यातील भाजप कार्यकारिणीने मोठी ताकद उभी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. यशपाल भिंगे यांना पुढे करून ओबीसी कार्ड पुढे केले आहे. कधी नव्हे ते प्रचंड मोठा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीला प्रतिसाद मिळाला. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे ओवेसी यांच्या मोठ्या सभा झाल्या. दलित व मुस्लीम या मतांच्या पॉकेटसह ओबीसींची मतेही वंचित बहुजन आघाडीकडे जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडेल यानुसारच विजयाचे गणित ठरणार आहे.
लोकसभेच्या प्रचारादरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. नांदेड लोकसभेचे चित्र हे सध्या विचित्र अवस्थेत असून अशोक चव्हाण गड राखणार की भाजपचा 'प्रताप' होईल याकडे देशाचे लक्ष्य लागले आहे.
२०१४ चा निवडणूक निकाल -
अशोक चव्हाण (काँग्रेस) : ४९३०७५
डी. बी. पाटील (भाजप) : ४११६२०
विधानसभा पक्ष मताधिक्य -
भोकर काँग्रेस - २३१९९
उत्तर नांदेड काँग्रेस ४३१५४
दक्षिण नांदेड काँग्रेस -२७०९६
नायगाव भाजप - ३८४६
देगलूर काँग्रेस - २३३७
एकूण मतदार -
एकूण: १७००९९१
पुरुष : ८८३१३८
महिला : ८१७७९५ व इतर मतदार ५८
नवमतदार : २६३३३७