नांदेड Nanded Hospital Death : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे मराठवाड्यातील दुसरं सर्वात मोठं रुग्णालय. नांदेड, परभणी, हिंगोली या आजुबाजुच्या जिल्ह्यांसह तेलंगणा व कर्नाटकातील रुग्णही इथं उपचारासाठी येतात. या रुग्णालयात जवळपास ५०० बेड आहेत. मात्र सद्यस्थितीत इथं १२५० रुग्ण उपचार घेत आहेत.
रुग्णालयात सुविधांचा अभाव : कोट्यावधी रुपये खर्च करुन नांदेड मध्ये हे रुग्णालय उभारण्यात आलं. मात्र इथं ज्या प्रकारे आरोग्य सुविधा पाहिजे, त्याचा अभाव दिसून येतोय. येथील सिटी स्कॅन मशीन, एक्स रे मशीन यासह इतर आवश्यक तपासणी मशीन बंद असल्याची माहिती आहे. इथं परिचारिका आणि डॉक्टरांची संख्याही कमी आहे. तसेच क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण संख्या असूनही आरोग्य यंत्रणा मात्र याबाबत गाफिल आहे. इथं इमर्जन्सी औषधी उपलब्ध असल्याचा दावा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी केला, मात्र प्रत्यक्षात बरीच औषधं बाहेरुन आणावी लागत असल्याचं रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितलं.
अशोक चव्हाण यांनी रुग्णालयास भेट दिली : या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रुग्णालयाला भेट दिली. 'रुग्णालयात सक्षम आरोग्यसेवेअभावी २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू होण्याची घटना गंभीर आहे. याची चौकशी झालीच पाहिजे. रुग्णालयात आणखी ७० रुग्ण गंभीर अवस्थेत असून, राज्य सरकारनं युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवण्याची आवश्यकता आहे. इथल्या परिचारिकांच्या बदल्या झाल्या. मात्र, रिक्त झालेल्या पदांवर नवीन नेमणूक झाली नाही. डॉक्टरांची देखील मोठ्या प्रमाणात कमतरता आहे', असं ते म्हणाले.
डीपीडीसीतून मिळणाऱ्या निधीला तांत्रिक मान्यता न मिळाल्यानं रुग्णालयासमोर आर्थिक संकट आहे. सीटीस्कॅन व इतर उपकरणांच्या देखभालीसाठी केलेल्या कराराचे पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे संबंधित सेवा पुरवठादारांनी देखभाल थांबवली असून, येथील अनेक उपकरणं बंद पडली आहेत. रुग्णालयाची क्षमता ५०० रुग्णांची असताना आज तिथे १२५० रुग्ण दाखल आहेत. रुग्णालयात दाखल ७० गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असेल तर खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी, अशी सूचना मी प्रशासनाला केली. - अशोक चव्हाण
नागरिकांमध्ये असंतोष : या प्रकरणी पुढं बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, येथील असुविधा व अडचणींबाबत माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाशी आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर चर्चा झाली. ही वेळ राजकारण करण्याची नाही. त्यामुळे आज मी कोणत्याही निष्कर्षावर जाणार नाही. चौकशीअंती दोष कुणाचा हे स्पष्ट होईल. परंतु, राज्य सरकारनं तातडीनं रुग्णालयाची परिस्थिती न सुधारल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
आरोग्य संचालकाची समिती चौकशी करणार : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेची दखल घेत राज्यातील आरोग्य संचालकाची एक समिती गठीत करण्यात आली. समितीचे सदस्य चौकशीसाठी मंगळवारी रुग्णालयाला भेट देणार आहेत.
रुग्णालयाकडून देण्यात आलेली माहिती : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० सप्टेंबर २०२३ ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये १२ प्रौढ रुग्ण (५ पुरुष, ७ महिला) व १२ बालक रुग्ण होते. प्रौढ रुग्णांमध्ये ४ हृदयरोगी, १ विषबाधा झालेला, १ जठरव्याधी, २ किडनी व्याधी, १ प्रसूती गुंतागुंत आणि ३ अपघात व इतर आजारग्रस्त रुग्ण होते.
हेही वाचा :