नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व धर्मीयांची तीर्थस्थळे आणि प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद ठेण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. असे असतानाही वारंवार सुचना देऊन देखील गुरुद्वारा बोर्डाने भाविकांना गुरुद्वारात दर्शनासाठी प्रवेश देणे सुरुच ठेवले. त्यामुळे बुधवारी गुरुद्वारा बोर्डाच्या अधीक्षकांसह दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा... मागणारे हातही जेव्हा देणारे होतात... नांदेडमध्ये गरजूंना जेवण देण्यासाठी तृतीयपंथीय सरसावले
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने १७ मार्च रोजी एक परिपत्रक काढून धार्मिक स्थळावरील भाविकांची गर्दी टाळण्याच्या सुचना दिल्या होत्या. असे असतानाही गुरुद्वारा बोर्डाने या सुचनेकडे दुर्लक्ष करत भाविकांना गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी प्रवेश देणे सुरुच ठेवले. त्यामुळे सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात येत नसून प्रशासनाच्या सुचनेचे पालन न करता गर्दी करण्यात येत आहे. याविषयी गुरुद्वारा प्रशासनाला भाविकांची गर्दी टाळण्याबाबत सुचना देऊनही गुरुद्वारा प्रशासनाने सुचनांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक व अन्य दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय अपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.