नांदेड - पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणाऱ्या योग विद्येची भारताने संपूर्ण जगाला अनमोल देणगी दिली आहे. सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यासासारखे सहज सोप्या पद्धतीने व कोणताही खर्च न लागणारे असे प्रभावी माध्यम प्रत्येकाजवळ उपलब्ध आहे. कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात योगाभ्यासाची जीवनशैली प्रत्येकाच्या अंगी रुजल्यास आपल्याला अधिक सुरक्षित होता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी शासनाच्या निर्देशाचे पालन करत जिल्हाधिकारी प्रशासनातील निवडक अधिकाऱ्यांनी योगाभ्यास केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेला हा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवरुन लाईव्ह करण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत जागतिक योग दिवसाचा कृतिशील संदेश पोहोचवणे शक्य झाले.
योग ही जीवनशैली असून ती प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केली. निरोगी आयुष्यासाठी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक एकात्मता तेवढीच आवश्यक असते. या तीन सुत्रांना योगाभ्यासाद्वारे स्वत:च्या मनावर ताबा मिळविता येणे शक्य होते. शारीरिक स्वास्थाबरोबर मनस्वास्थही अधिक महत्वाचे असून योगाभ्यासाद्वारे हे सहज साध्य होते, असेही डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. यावेळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. यशवंत पाटील यांनी योगाचे महत्व विशद केले.
आंतरराष्ट्रीय योगासन साधक श्रेयस मार्कंडेय व डॉ. शर्मिली पाटील यांनी योगाभ्यासाचा सराव घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक हे सुरक्षित अंतराच्या नियम पालन करत सहभागी झाले.