नांदेड : लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिंपरी महिपाल येथील शुभांगी जोगंदड ही तरुणी बीएएमएस च्या तिसऱ्या वर्गात शिकत होती. शुभांगीचे गावातील एका तरुणासोबत प्रेम संबंध जुळले. वैद्यकीय शिक्षण घेणारी आपली मुलगी गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंधात अडकल्याने आपली गावात बदनामी होईल या भितीने तिच्या घरातील आई-वडिलांसह इतरांचा या प्रेम संबंधाला विरोध होता.
दुसऱ्यासोबत ठरवले लग्न : प्यार किया तो डरना क्या, या भावनेने प्रेरित झालेली शुभांगी तरुणासोबत असलेले प्रेम संबंध तोडण्यास तयार नव्हती. नातेसंबंधातील सर्वानी तिची समजूत काढल्यानंतरही ती आपल्या निर्णयावर ठाम होती. मुलगी हट्ट सोडत नाही हे पाहून तिच्या आई-वडिलांनी तीन महिन्यापूर्वी दुसऱ्या एका तरुणासोबत तिची सोयरिक पक्की केली. परंतु प्रेमसंबंधात गुरफटलेल्या शुभांगीला हे लग्न मान्य नव्हते. तिने हे लग्न मोडित काढले. मुलीने ठरलेले लग्न मोडल्याने गावात आपली बदवामी झाली असा तिच्या आई-वडिलांसह आप्त स्वकियांचा समज झाला. त्यामुळे सर्वानीच शुभांगी बाबत धक्कादायक निर्णय घेतला.
घरातच केली निर्घृण हत्या : रविवारी शुभांगी घरी असताना तिची घरातच निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर गावातील एका शेतातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तिची राख दुसऱ्या गावात नेऊन फेकण्यात आली. यामुळे समाज एका भावी वैद्यकीय व्यावसायिकाला मुकला आहे. खुनानंतर सर्वच पुरावे नष्ट करण्यात आल्याने शुभांगीच्या मृत्युचा कोणालाही सुगावा लागणार नाही अशी घरातील सर्वांची ठाम समजूत होती.
पुरावेही केले नष्ट: परंतु कितीही सफाईने खून केला तरी खुनाला वाचा फुटतेच. वैद्यकीय शिक्षण घेणारी शुभांगी गावात दिसत नाही ही बाब गावातील काही लोकांच्या लक्षात आली. तिच्या गायब होण्याने गावात कुजबुज सुरु झाली. गावातील काही लोकांना शुभांगीच्या अदृश्य होण्यामुळे संशय बळावल्याने ही माहिती काही अज्ञात लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्यानंतर शुभांगीची घरातील लोकांनीच हत्या करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या वडिलांसह पाच जणांना अटक केेली. अटक झालेल्यात मुलीचे मामा, काका, दोन चुलत भाऊ यांचा समावेश आहे.
हेही वाचा : Nanded Crime खंजीर घेऊन तरुण मागे धावला जीव वाचवण्यासाठी हॉटेल चालक कॅबिनमध्ये लपला