नांदेड - शहरात अनधिकृतपणे फलकबाजी करणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कारण, रहदारी तसेच वाहतूक जास्त असलेल्या ठिकाणी व चौकांमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर महापालिकेच्यावतीने लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने खासगी जागेवरील जाहिरात फलक वगळून सात जागा फलक प्रतिबंधित क्षेत्र (नो बॅनर झोन) म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नांदेड मनपा आयुक्तांनी दिला आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत जाहिरात, घोषणा होर्डिंग, पोस्टर यासंदर्भात संबंधित विभागाची नुकतीच बैठक घेऊन आढावा फलक घेतला. यावेळी उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका हद्दीमध्ये विनापरवानगी जाहिरात फलक लावता येणार नाहीत. मात्र, तरीदेखील काही जण विनापरवानगी जाहिरात फलक लावत असल्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे असे फलक २४ तासांच्या आत काढून घ्यावेत, अन्यथा फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. लहाने यांनी दिला आहे.
आदेशाचे पालन करण्याचे संघटनांना सूचना-
विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांकडूनही बऱ्याच ठिकाणी वाढदिवसाचे, अभिनंदनाचे किंवा आंदोलनाचे व इतर प्रकारचे जाहिरात फलक अनधिकृतपणे व विनापरवानगी लावण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधितांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
या ठिकाणी असणार फलक प्रतिबंधित क्षेत्र
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच अनधिकृत जाहिरात फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव दाखल केला आहे. राज कॉर्नर (तरोडेकर चौक), वर्कशॉफ कॉर्नर, आयटीआय कॉर्नर (महात्मा फुले पुतळा), शिवाजीनगर, वजिराबाद (मुथा चौक), देगलूर नाका आणि अण्णाभाऊ साठे चौक आदी ठिकाणी खासगी जागेवरील जाहिरात फलक वगळून 'नो बॅनर झोन' घोषित करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.