नांदेड - गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशासह राज्यात कोरोना संसर्गाच्या सावटाखाली संपूर्ण मानव जात जगत होती. या कोरोनाने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. परंतु तब्बल दोन वर्षांनंतर आज (२९ जून) नांदेडकरांनी या कोरोनाला हरविले आहे. म्हणजेच आज एकूण १४९२ टेस्टिंग पैकी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. शिवाय कोणत्याही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. शिवाय आज ९ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत.
नऊ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी -
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 1 हजार 904 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 9 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मुखेड कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत 2, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
138 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू -
जिल्ह्यात 138 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 21, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 4, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 51, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 49, खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 124, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 129 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकूण घेतलेले स्वॅब- 6 लाख 5 हजार 440
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 2 हजार 589
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 231
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 597
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 904
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.11 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-86
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-138
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4
धारावीत तिसऱ्यांदा शुन्य रुग्णसंख्या -
देशात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मुंबईकरांना आणि महाराष्ट्रालाही कोरोनाचे उग्र रूप पहिल्यांदा दाखवलं ते धारावीने. मोठ्या प्रमाणावर दाटीवाटीच्या असलेल्या या भागामध्ये वेगाने वाढणाऱ्या कोरोनाला आवर घालणं हे मोठं आव्हान मुंबई महानगर पालिका प्रशासनासमोर होते. मात्र त्यावर मात करत ही रुग्णसंख्या नियंत्रणात आणत धारावीने जगासमोर एक ‘मॉडेल’च उभे केले आहे. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये धारावीत पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याचं दिसल्यानंतर आता धारावीनं पुन्हा एकदा आपले मॉडेल सिद्ध केले आहे. धारावीत १४, १५ व २३ जून रोजी शुन्य रुग्ण व शुन्य मृत्यूची नोंद झाली आहे.
सोमवारी नागपूरमध्ये शुन्य मृत्यूची नोंद -
कोरोनापासून नागपूरकरांना दिलासा देणारी बातमी आहे. नागपुरात २८ जून रोजी शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. २४ तासात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. या महिन्यात तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली असल्याने नागपूरकरांना नक्कीच दिलासा मिळाला आहे . कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या २८ जूनला शहरात फक्त 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 69 जणांनी केली कोरोनावर मात केली.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसरी लाटेत पहिल्यांदा एकही बळी नाही -
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसरी लाटेत पहिल्यांदा एकही बळी गेला नाही. यापूर्वी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी कोरोना बळींची संख्या शून्य इतकी नोंदवली गेली होती. त्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी हे दिलासादायक आणि आशादायी चित्र २० जून रोजी समोर आले.