नांदेड- काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसमधून निवडणुक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात २ आणि ३ ऑगस्ट रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
मुलाखतीवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक म्हणून माजी आमदार सुभाष झांबड, राजन भोसले, लियाकत अन्सारी हे उपस्थित राहणार आहेत. २ ऑगस्टला सकाळी १० ते १ वाजेपर्यंत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ, दपारी १ ते २ मुखेड मतदारसंघ, २ ते ४ या वेळेत देगलूर राखीव मतदारसंघ तर सायंकाळी ४ ते ५ या वेळेत हदगाव मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
3 ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ, दुपारी १२ ते २ भोकर मतदारसंघ, ३ ते ४ किनवट मतदारसंघ, सायंकाळी ४ ते ५ नायगाव मतदारसंघ आणि ५ ते ६ लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह नांदेडच्या प्रगती महिला मंडळात नियोजित वेळेनुसार विधानसभा मतदारसंघनिहाय उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अमरनाथ राजूरकर आणि जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले आहे.