नांदेड - नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचा सभापती बिनविरोध निवडून आला. मात्र, या निवडीमागे भाजपाची खेळी यशस्वी ठरली आहे. 'शिवाजीनगर' च्या मनातील सभापती होऊ न देण्यात 'वसंतनगर' चा मोठा वाटा असून भाजपच्या मनातीलच सभापती करावा लागला आहे.
काँग्रेसचे संभाजी पाटील पुयड यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक झाल्यानंतर सभापती संभाजी पुयड यांनी भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वसंतनगरचे घर गाठून आभारही मानले आहेत.
मराठवाड्यातील क्रमांक दोनची आर्थिक उलाढाल असलेली बाजार समिती म्हणून नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. या बाजार समितीमध्ये एकूण अठरा संचालक असून 13 काँग्रेसचे तर 5 भाजप-शिवसेना अशी सदस्य संख्या आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे बी.आर.कदम यांनी राजीनामा दिला होता. पक्षश्रेष्ठीच्या दबावाखाली येऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या अनेक दिवसांपासून बी.आर. कदमही पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे नव्याने सभापतीची निवड करणे गरजेचे होते.
सभापती पदासाठी काँग्रेसकडून आनंदराव कपाटे, दीपक पाटील, संभाजी पुयड पुणेगावकर तर भाजप- शिवसेनेकडून दत्ता पाटील पांगरीकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. सभापती निवडण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाच अंतिम आदेश असतो. शिवाजीनगरहून त्याच नावाचा बंद लिफाफाही आला. पण पहिल्यांदाच या आदेशाला संचालक मंडळाच्या बैठकीत नकार मिळाल्याची चर्चा होती. संभाजी पाटील पुयड यांनी तर मी उमेदवारी मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यातच काँग्रेसकडून जे नाव जाहीर होईल त्या विरोधात भाजप-शिवसेना आपली मते त्याच्या बाजूने टाकणार होती. ऐनवेळी संभाजी पुयड यांच्या बाजूनेही आपले बळ लावण्याची भाजपने संकेत दिले होते.
काँग्रेसमधीलही अंतर्गत बंडाळीमुळे भाजप-सेनेचाच उमेदवार ऐनवेळी निवडून येवू नये यासाठी अखेरच्या टप्प्यात संभाजी पाटील पुयड यांचेच नाव कॉंग्रेसला पुढे करावे लागले. अंतिम टप्प्यात आनंदराव कपाटे व दीपक पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला. तसेच शिवसेनेचे दत्ता पाटील पांगरीकर यांनीही आपला अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी सभापती संभाजी पुयड यांनी पदभार स्वीकारला. संभाजी पुयड यांचे आ.डी. पी.सावंत, भाऊराव कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, तिरुपती कदम, चिमेगावकर, श्रीराम पाटील, आनंदराव कपाटे, संजय लोणे, विठ्ठल पाटील डक, यांच्यासह सर्व संचालक मंडळ यांनी स्वागत केले. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून लतीफ पठाण यांनी काम पाहिले.
सभापतीपदी निवड होताच भाजपचे खा. चिखलीकर यांचा घेतला आशीर्वाद..!
दरम्यान, काँग्रेसच्या गोटातून जरी संभाजी पुयड हे बिनविरोध निवडून आले असले तरी भाजप-सेनेचा हात त्यांच्यावर होता, अशी चर्चा रंगत आहे. त्यातच त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. ऐनवेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही तुम्हालाच पाठिंबा देऊ असा शब्द दिला होता. त्यामुळे अप्रत्यक्ष का होईना भाजपच्या मनातील सभापती झाला. सभापती पदाचा पदभार स्वीकारताच संभाजी पुयड यांनी खा.चिखलीकर यांचे आशीर्वाद घेतले. तसेच मी भाजपा आणि सेनेमुळेच सभापती झाली असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यामुळे काँग्रेसला मात्र लोकसभा निवडणुकीनंतर एक चांगलीच चपराक बसली आहे.