नांदेड - शेतकऱ्यांनी आगामी हंगामातील कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असून यासाठी शेतात असलेले कापसाचे पीक काढून टाकावे. तसेच शेतात असलेल्या कापसाची फरदड घेऊ नये, असे आवाहन कापूस निर्मूलन मोहिम अंतर्गत कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व पुढील वर्षी होणारा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना हाती घ्याव्यात. सध्या कापूस पीक हंगाम संपुष्टात आला असून फरदडीमुळे कापूस बोंड अळीचे जीवनचक्र अखंडितपणे सुरू राहते. तसेच कापूस पिकाची काढणी केल्यानंतर कच्चा कापूस दीर्घकाळासाठी साठवलेल्या ठिकाणी कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंड अळीला खाद्य मिळाल्याने पुढील हंगामात या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करून पुढील हंगामातील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता फरदड निर्मूलन मोहीम राबविणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक कापूस उत्पादक गावातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले शेत व गाव फरदडमुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत व जानेवारी महिना अखेर सर्व शेतातील गावातील कापसाचे पीक काढून नष्ट करावे. तसेच फरदड कापूस न घेणे बाबत निर्धार करावा, असे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे.
का घेऊ नये फरदड
जानेवारी 2021 अखेर सर्व गावातील कापूस पीक शेतातून पूर्णपणे काढून टाकावे व फरदड घेऊ नये. गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र संपुष्टात आणण्यासाठी 5 ते 6 महिने कापूस पिकाखालील क्षेत्र हे कापूस पीक विरहित ठेवणे गरजेचे आहे. गुलाबी बोंड अळीला डिसेंबर नंतर खाद्य उपलब्ध न झाल्यास ती सुप्तावस्थेत जाते परंतु फरदडीमुळे अळीला खाद्य उपलब्ध होते व त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र अखंडितपणे सुरू राहते व पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. फरदडीपासून थोडेफार उत्पादन जरी मिळत असले तरी गुलाबी बोंड अळीमुळे येणा-या हंगामात होणा-या नुकसानीचा विचार करून प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पर्हाट्या रोटावेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे छोटे-छोटे तुकडे करून जमिनीत गाडाव्यात, अशा मार्गदर्शक सुचनाही कृषी विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
या उपाययोजना कराव्या
कापूस वेचणी संपल्यानंतर शेतात शेळ्या, मेंढ्या किंवा इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत जेणेकरून प्रादुर्भावग्रस्त पाती व बोंडे खाल्ल्याने बोंड अळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात कमी होईल. कापूस पिकाच्या पर्हाट्यामध्ये किडींच्या सुप्तावस्था राहत असल्याने अशा पर्हाट्या, कीडग्रस्त बोंडे, पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे, त्याची साठवणूक करू नये. ज्या ठिकाणी कापूस दीर्घकाळ साठवून ठेवला जातो अशा ठिकाणी कामगंध सापळे, प्रकाश सापळे लावून पतंग नष्ट करावेत. या ठिकाणी निर्माण झालेला कचरा, सरकी, अळ्या व कोष नष्ट करावेत. या संपूर्ण बाबींचा वापर करून शेतकरी बांधवांनी फरदडमुक्तीचे धोरणाचा अवलंब करून व पुढील हंगामातील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करून सहकार्य करावे, असे आवाहन देखील कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
फरदड टाळून कोणती पिके घ्यावी
कापूस पिकाचा हंगाम संपुष्टात आल्याने कापूस पिकाचे क्षेत्रात सिंचनाची सोय उपलब्ध असलेल्या ठिकाणी उन्हाळी ज्वारी, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी सोयाबीन, भाजीपाला चारा पिके टरबूज, खरबूज इत्यादी पिके घ्यावेत व कुठल्याही परिस्थितीत कापूस पिकाचे फरदड घेण्याचे टाळावे. संपूर्ण तालुका शंभर टक्के फरदडमुक्त होण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उपाययोजना हाती घ्याव्यात जेणेकरून गुलाबी बोंड अळीचा भविष्यातील प्रादुर्भाव टाळता येईल, असे देखील शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे सर, उपविभागिय कृषी अधिकारी नांदेड, रविकुमार सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्या मदतीने व शेतकऱ्यांच्या सहकार्याने तालुक्यात फरदडमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.