नांदेड - निजामकालीन जिल्हा परिषद मुलींची हायस्कूल व उर्दू शाळा नगर परिषदेने पर्यायी व्यवस्था न करता पाडली. त्यामुळे मराठी व उर्दू माध्यमाच्या ७५ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा प्रकार किनवटमध्ये घडला. पालिकेने नेस्तनाबूत केलेल्या जुन्या इमारतीच्या ढिगाऱयावर पहिल्याच दिवशी शाळा भरण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. त्यामुळे पालिकेच्या पायऱ्यांवर राष्ट्रगीत व प्रार्थना घेण्यात आली.
किनवटच्या मध्यवर्ती भागात निजामकालीन जिल्हा परिषदेची माध्यमिक कन्या प्रशाला व उर्दू शाळा होती. उर्दू माध्यमांचे पहिली ते चौथीचे २६ तर मराठी माध्यमाचे पहिली ते सातवी ४९ असे ७५ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. यापूर्वी नगर परिषद किनवट ते उर्दू व मराठी माध्यमाच्या दोन इमारती पाडून त्या इमारतीच्या समोरच्या भागात नगर परिषद किनवटची नवीन इमारत बांधण्यात आली. ३ जूनला दस्तऐवज व शैक्षणिक साहित्य न हलवता इमारत पाडण्यात आली. या दरम्यान, संबंधितांनी विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करायला हवी होती, मात्र तसे झाले नाही.
त्यामुळे १७ जूनला शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. या शाळेची इमारत पडलेली असल्याने आता कुठे जावे? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. शेवटी शाळेच्या ढिगाऱ्यावर वर्ग भरवण्यात आले तर नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या पायऱ्यांवर राष्ट्रगीत व प्रार्थना घेण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.