नांदेड - पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सन 2020-21 या रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील 88 हजार 791 शेतकऱ्यांनी गहू, हरभरा व रब्बी ज्वारीसाठी पीकविमा भरला आहे. यात शेतकऱ्यांनी तीन कोटी 17 लाख रुपयांचा विमा हप्ता भरल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
15 डिसेंबर होती अंतिम मुदत
पंतप्रधान पीकविमायोजनेअंतर्गत जिल्ह्यात इफ्को टोकीयो कंपनीची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात रब्बी ज्वारीसाठी पीकविमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर तर गहु बागायती, हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर अंतिम मुदत होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले होते.
तीन कोटी 17 लाख पाच हजार 287 रुपयांचा भरला विमा हप्ता
यात बागायती गव्हासाठी 35 हजार जोखीम रक्कम तर हेक्टरी 570 रुपये विमा हप्ता होता. रब्बी ज्वारीसाठी 28 हजार जोखीम रक्कम होती तर 420 रुपये विमा हप्ता होता. हरभऱ्यासह हेक्टरी 35 हजार रुपये विमा जोखीम रक्कम होती तर 525 रुपये विमा हप्ता होता. विमा हप्ता भरण्याच्या मुदतीत जिल्ह्यातील 88 हजार 791 अर्जदार शेतकऱ्यांनी तीन कोटी 17 लाख पाच हजार 287 रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. विमा हप्त्यात राज्य सरकारचा हिस्सा 28 कोटी 89 लाख व केंद्राचा हिस्सा 28 कोटी 79 लाखांचा राहणार आहे. विमा कंपनीला एकूण 60 कोटी 75 लाखांचा विमा हप्ता मिळणार आहे. यातून विम्यापोटी एकूण 211 कोटी 36 लाख 85 हजार 943 रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली आहे. जिल्ह्यात सर्वाधीक 65 हजार 521 शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी विमा भरला आहे.
हेही वाचा - अर्धापुरात दोन गटात तुंबळ हाणामारी; बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल....
हेही वाचा - नांदेडमध्ये कारागृहातील दोन कैद्याकडे आढळले मोबाईल