नांदेड - सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील सोळापैकी अकरा तालुक्यांतील ३८१ गावांना याचा फटका बसला. यापूर्वी ३८ हजार २४२ हेक्टर नुकसानीचा अंदाज होता. त्यात वाढ होऊन आता ८२ हजार ९६० हेक्टरवरील खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. याबाबतचा अहवाल शासनाला कळविण्यात आला आहे. आता यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ( एनडीआरएफ ) च्या निकषानुसार ५६ कोटी ४१ लाख रुपये लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस होता. काही भागात अतिवृष्टीही झाली आहे. या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील काही मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढला आहे.
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील ३८१ गावांतील ८२ हजार ९६० हेक्टरवरील खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त करून शासनाला कळविले आहे. यासाठी एनडीआरएफच्या निकषानुसार ५६ कोटी ४१ लाख रुपये लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली, नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी एनडीआरएफच्या हेक्टरी सहा हजार आठशे रुपये या निकषानुसार ५६ कोटी ४१ लाख रुपये लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकरी संघटनांसह विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली.