नांदेड - ठाण्याच्या हद्दीत मोबाईल लंपास केल्याच्या घटनांमध्ये काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. शहरात गुरुद्वारा दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा ६० हजारांचा महागडा आयफोन चोरला, तर शहरातील यशगरी रस्त्यावर दुचाकीस्वारांनी एकाचा मोबाईल लंपास केला. यामुळे मोबाईल धारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरात मोबाईल चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. सात ऑक्टोबरला सकाळी सातच्या सुमारास येथील सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी शहरात आलेल्या एका महिलेच्या पर्समधून ६० हजार रुपयांचा आयफोन लंपास केला झाला. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात रुपेंद्रसिंघ हरदेवसिंघ यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका घटनेत यश नगरातील तरुणाचा रस्त्यावरुन जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. यशनगरी येथील ऋषिकेश भगवान मोरे (२७) हा कामनिमित्त बाहेर गेला असता दोन अज्ञात चोरटे पल्सर दुचाकीवरुन आले आणि त्यांचा मोबाईल (किंमत १३ हजार ९९९) लंपास केला. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरातील मोबाईल चोरांची टोळी कार्यरत झाल्याने पोलिसांनी या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.