नांदेड - मोबाईलवर पब्जी खेळताना झालेल्या ओळखीतून शहरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तिचे अपहरण करून तिला पंजाबमध्ये नेले होते. मात्र, पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
शहरातील एका १३ वर्षीय मुलीला मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्याचा छंद जडला होता. गेम खेळताना काहीवेळा समोरच्या व्यक्तींसोबत बोलण्याची देखील सोय असते. त्यामधून नांदेडच्या मुलीची पंजाब येथील एका १९ वर्षीय तरुणाशी ओळख झाली. मोबाईलवर दोघांचा संवाद वाढत गेला. यामधून ती त्याच्या जाळ्यात अडकली. त्यानंतर तो तरुण नांदेडला आला आणि मुलीला पळवून पंजाबला घेऊन गेला.
मुलीचे कुटुंबीय तिला शोधत होते. मात्र, शहरात कुठेही तिचा शोध लागला नाही. शेवटी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला शोधले असता त्यांच्या ऑनलाईन मैत्रीचे प्रकरण समोर आले. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यामधून मुलीला पंजाबमध्ये नेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक पंजाबमध्ये गेले. मुलीसह त्या तरुणाला नांदेडमध्ये आणले. त्यानंतर मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
हे वाचलं का? - एक ना दोन... ५० हुन अधिक घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारा 'तो' भामटा गजाआड
दरम्यान, मुलांना मोबाईल खेळायला देताना सावधानता बाळगावी, असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी केले आहे.