नांदेड- एका अल्पवयीन तरुणीने बदनामी झाली म्हणून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लोहा येथे घडली आहे. या घटनेच्या आठ दिवस अगोदरच नोकरी मिळवण्याच्या आमिषाला ती बळी पडली होती. याप्रकरणी पोलिसांनी राहुल बडवणे याला अटक केली आहे.
हेही वाचा- रजनीकांत यांनी फेटाळले 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'वेळी अपघात झाल्याचे वृत्त
२१ जानेवारी रोजी हळदव (ता. लोहा) येथील एक तरुणी शिकवणीला जाते म्हणून घराबाहेर पडली. सुरुवातीला तिने आपणास किडनॅप केल्याचे भासवले. मात्र, वास्तविक ती प्रवाशी वाहनातून नांदेडला गेली. राहुल सदाशिव बडवणे (वय २० रा. पिंपळगाव कोरका ता.जि. नांदेड) याने तिला नोकरी देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेतले होते. दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार लोहा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस तपासात मुलीच्या मोबाईलचे लोकेशन नांदेड शिवाजीनगर येथे दिसून आले. पोलीस पथक नांदेडला रवाना झाले मात्र, तेव्हा मुलीचा मोबाईल बंद होता.
दुसऱ्या दिवशी मुलीनेच घरी फोन करून मी नांदेड बस स्थानकात असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिला घरी आणण्यात आले. नोकरीचे आमिष दाखवून राहुल बडवणे याने मला बोलावून घेतले. त्याच्याच सांगण्यावरून किडनॅप झाल्याची मी खोटी माहिती घरी दिली असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले.
याप्रकरणी आरोपी राहुल बडवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या घटनेच्या आठ दिवसानंतर मंगळवारी त्या मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी तिने राहुल बडवणे याने माझी बदनामी केल्यामुळे मला मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. माझ्या मृत्यूस तोच कारणीभूत असल्याची चिठ्ठी लिहिली आहे, याची माहिती पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.