नांदेड - नागरिकांची कामे त्वरीत व्हावीत, यासाठी दक्षिण नांदेड तहसीलची निर्मीती करा अशी मागणी मराठी पत्रकार संघाने केली आहे. यामुळे नांदेड तहसील कार्यालयावरचा भार कमी होईल, असे सांगण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
नांदेड दक्षिण परिसरात ४५ गावे आणि महानगर पालिकेतील सिडको-हडको, वाघाळा, असर्जन, वसरणी, कौठा आदींसह जुन्या नांदेड परिसराचा काही भाग समाविष्ट आहे. उत्तर नांदेड परिसरातील अनेक गावे, महानगर पालिकेतील बहुसंख्य भाग व नांदेड तालुक्यातील सर्वच गावे नांदेड तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येतात. या कार्यालयावर अवलंबून असणारी लोकसंख्या जवळपास ८ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे यावर अतिरिक्त बोजा पडतो.
या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची संख्या कमी असल्याने यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून औरंगाबादच्या धर्तीवर कार्यालयाचे विभाजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी सोनकांबळे, उपाध्यक्ष संग्राम मोरे, सचिव किरण देशमुख, कोषाध्यक्ष तिरुपती घोगरे, कार्याध्यक्ष दिगाबर शिंदे, सहसचिव सारंग नेरलकर, सल्लागार रमेश ठाकुर, तुकाराम सावंत, निळकंठ वरळे, अनिल धमने, शिवाजी राजुरकर, श्याम जाधव उपस्थित होते.