नांदेड : Maratha youth suicide : मराठा आरक्षणासाठी तरुणानं विष प्राशन करुन आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. शुभम सदाशिव पवार असं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणानं सुसाईड नोट लिहून आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना हदगांव तालुक्यातील वडगांव इथं आज सकाळी उघडकीस आली आहे.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या : हदगाव तालुक्यातील वडगाव इथल्या शुभम सदाशिव पवार या तरुणानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वडगाव इथला हा युवक पुणे इथं खासगी कंपनीमध्ये कामाला होता. तो शनिवारी गावाकडं निघाला होता. नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी पोचल्यानंतर त्यानं वडिलाला शेवटचा संपर्क केला. इथून पुढं आठ तास त्याचा संपर्क झाला नाही. त्यामुळे कुटुंबाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
चिठ्ठी लिहून केली आत्महत्या : शुभम सदाशिव पवार यानं नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर परिसरात जाऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आढळून आला, यावेळी त्याच्या खिशात मराठा आरक्षणासंदर्भात चिठ्ठी लिहून ठेवल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालेला आहे. मराठा आरक्षणासाठी तरुणानं आत्महत्या केल्यानं मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी रोडवर उतरत टायर जाणून आपला रोष व्यक्त केला.
मराठा समाज आक्रमक : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं असून आज मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. त्यातच आता नांदेड इथल्या तरुणानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे मराठा समाजातील आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे हे आंदोलन तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा :