नांदेड - पत्नीचा खून केल्या प्रकरणी पतीला जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया यांनी सुनावली आहे.
कौठा भागातील रहिवासी हिरासिंह उर्फ उमेशसिंह ठाकूर (वय 27 वर्षे) याचा विवाह याच भागात राहणाऱ्या कोमलसोबत झाला होता. चार वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार सुखात चालू होता. पण, कोमलला पती हिरासिंह, सासू निर्मलाबाई व दीर गणेशसिंह ठाकूर यांनी रिक्षा घेण्यासाठी माहेरहून 50 हजार रुपये घेऊन ये म्हणून तगादा लावला. पैशासाठी त्यांनी तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्यानंतर समाजातील प्रतिष्ठितांची बैठक होऊन तिथे तडजोड करण्यात आली. पण, त्यानंतरही त्रास सुरूच राहिला. त्यातून 5 फेब्रुवारी, 2016 रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास आरोपी हिरासिंहने घरातील लाकडी दांडक्याने हाणामारी केली. यात तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कोमलचे वडिल कंवलसिंह परमार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिसांनी कोमलचा पती हिरासिंह, सासू निर्मलाबाई व दीर गणेशसिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करुन पोलीस उपनिरीक्षक पी.के. मराडे यांनी तिघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात दहा साक्षीदार तपासून प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया यांनी आरोपी हिरासिंह याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सबळ पुराव्या अभावी सासू निर्मलाबाई व दीर गणेशसिंह ठाकूर यांची निर्दोष सुटका केली. या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील आशिष गोदमगावकर यांनी काम पाहिले.
हेही वाचा - नांदेडमध्ये आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध कारवाई