नांदेड - माहूर शहरातील सराफ बाजारात मुख्य ठिकाणी असलेल्या 'जयश्री ज्वेलर्स' या दुकानाचे शटर वाकवून चोरांनी चांदीचे दागिने लंपास केले. या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणांहून सहा दुचाकीही पळवल्या. चोरांनी घातलेल्या धुमाकुळाने शहरात दहशत निर्माण झाली आहे.
माहूर येथील सराफ बाजारामध्ये कुंदन रुनवाल यांच्या मालकीचे जयश्री ज्वेलर्स हे सोने-चांदीचे दुकान आहे. नेहमी प्रमाणे रुनवाल आपले दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी हे दुकान फोडून सुमारे ३४ हजार ७५० रुपयांची चोरी केली. चोरट्यांनी दुकानातील चांदीच्या अंगठ्या, पैंजण, राशीचे खडे, लोखंडी पेटी असा मुद्देमाल लंपास केला. सोबतच दुकानात असलेल्या चार चाकी वाहनाची चावीही चोरटे सोबत घेऊन गेले. या चोरी दरम्यान चोरट्यांनी मुख्य तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मध्यरात्री अवघ्या दहा मिनटातच चोरट्यांनी दागिन्यांवर हात साफ केला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली. मात्र, चोरट्यांनी त्यांचे चेहरे झाकले होते
हेही वाचा - मुंबईत आज पाणी कपात; पाणीसाठा करुन ठेवण्याचे पालिकेचे आवाहन
दुकानात चोरी झाल्याची माहिती नगर पंचायतीचे सफाई कामगार गणेश जाधव यांनी सकाळी दुकान मालकाला दिली. रुनवाल यांनी या घटनेची माहिती माहूर पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, जमादार गजानन कुमरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कुंदन सीताराम रुनवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - लिफ्ट मागताय.. सावधान! लिफ्ट देत एकाला अज्ञात स्थळी नेऊन लुटले
बुधवारी रात्री चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाक्या पळवल्या. मात्र, अद्याप दुचाकी मलाकांकडून पोलिसात तक्रार दिलेली नाही. प्रतीक कोपुलवार यांच्या घरासमोरून त्यांची दुचाकी चोरट्यांनी पळवली होती. मात्र, थोड्याच अंतरावर ती फेकून देण्यात आल्याने ती सापडली. प्रतीक यांची गाडी चोरताना तीन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. यामध्ये त्यांचे चेहरे दिसत असल्याने तपासासाठी पोलिसांना याची मदत होऊ शकते.