नांदेड - जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल सोमवारी १८ जानेवारी रोजी जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीला आता मुहूर्त मिळाला आहे. मुखेड तालुक्यात एका ग्रामपंचातीचे विभाजन होवून एक नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्याने जिल्ह्यातील एकूण १ हजार ३१० ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण येत्या २८ व २९ जानेवारी रोजी तालुकास्तरावर काढून जाहीर करण्यात येणार आहे.
आधी जाहीर केलेले आरक्षण झाले होते रद्द -
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी आधी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ग्रामविकास विभागाने ११ डिसेंबर रोजीच्या एका आदेशान्वये सरपंच पदाची आरक्षण सोडत रद्द करून ती ग्राम पंचायतीच्या निवडणुकीनंतर घेण्याचे आदेश दिले होते.
१ हजार ३१० ग्रा.पं. च्या सरपंच पदाची आरक्षण सोडत -
दरम्यान जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदान झालेल्या ९०७ व उर्वरित बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचातीच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होऊन एकूण १ हजार ३० ९ ग्रामपंचायतीचे निकाल १८ जानेवारी रोजी हाती आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुखेड तालुक्यात जांब (बु .) ग्रामपंचातीचे विभाजन होऊन पाखंडेवाडी या नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीसह म्हणजे एकूण १ हजार ३१० ग्रा.पं. च्या सरपंच पदाची आरक्षण सोडत येत्या २८ व २९ जानेवारी काढून ती जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आरक्षणाची सोडत जिल्ह्यातील १६ तालुक्याच्या ठिकाणी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.
२८ जानेवारी रोजी आरक्षण जाहीर होणाऱ्या तालुक्यांची नावे-
नांदेड , भोकर , हदगाव , किनवट , धर्माबाद , बिलोली , देगलूर , कंधार
२९ जानेवारी रोजी आरक्षण जाहीर होणाऱ्या तालुक्यांची नावे -
अर्धापूर, मुदखेड, हिमायनगर, माहुर, उमरी, नायगाव, मुखेड व लोहा