नांदेड - ऑरेंज झोनमधून रेड झोनमध्ये चाललेल्या नांदेड जिल्ह्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील 2 ते 3 दिवसात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे. काही दिवसात परिस्थिती सुधारली तर आढावा घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने अंशत: शिथिल केलेल्या सवलतींचा लाभ नांदेड जिल्ह्याला सध्यातरी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी 3 मे वरुन 17 मे पर्यंत वाढवला आहे. मात्र, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्हे व महानगरांत काही प्रमाणात दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. रेड झोनमधील बाधितांचे क्षेत्र नसलेल्या भागात देखील काही प्रमाणात लहान एकल दुकाने सुरू करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. त्याचप्रमाणे सकाळी 10 ते सायंकाळी 6 अशी वेळ निर्धारित करून सीलबंद दारू विक्रीची दुकाने देखील सुरू करण्यास हिरवा झेंडा दाखवला आहे. अर्थात शारीरिक सुरक्षित अंतर, सॅनिटायझर व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अटी ठेवल्या आहेत. याशिवाय घराबाहेर पडताना स्वतः च्या खासगी कारमध्ये 2 किंवा 3 जण आणि दुचाकीवर एकाच जणाला परवानगी देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील आठवड्यात केलेल्या वर्गवारीत नांदेड जिल्हा ग्रीन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन धोका वाढला तरी नवीन वर्गवारी होईपर्यंत जिल्ह्यातील काही व्यवहार सुरू होतील. लोकांना घराबाहेर पडण्यास थोडी उसंत मिळेल, असे वाटत होते. परंतु, ही अपेक्षा फोल ठरली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी रविवारी रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार लॉकडाऊनसाठी पूर्वी जारी केलेले आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भाजीपाला व फळ विक्री सकाळी 7 ते 11 आणि दूध, किराणा व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 याच वेळेत सुरक्षित अंतर व अन्य नियमांचे पालन करून सुरू ठेवता येणार आहेत.
अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती व तसेच वैद्यकीय कारण वगळता अन्य कोणालाही घराबाहेर पडण्यास परवानगी राहणार नाही. ज्या सेवांना वेळ दिला आहे, त्या सेवेतील वेळेशिवाय संबधित व्यक्तींना घराबाहेर पडता येणार नाही. अन्यथा त्यांच्यावर गुन्हे नोंदवून वाहने जप्त करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
शेतीमाल उद्योग व वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत. नांदेड जिल्हा रेड झोनमध्ये जात असल्याने स्थलांतरित कामगार तसेच वैद्यकीय कारण वगळता इतरांना तूर्तास बाहेर जाता येणार नाही. तसेच बाहेरच्या जिल्ह्यातून येण्यावर देखील पुढील काही काळ निर्बंध कायम राहतील. दारूच काय अन्य कोणतीही दुकाने उघडता येणार नाहीत. तसेच कोणालाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येणार नाही. रस्ते बंद ठेवलेल्या बॅरेकेटिंग पुढील आदेशापर्यंत कायम ठेवल्या जाणार आहेत.