नांदेड : बिलोली येथील तदर्थ जिल्हा न्यायधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायधीश बिलोली बोहरा यांनी दोषी यादु उर्फ यादव गंगाराम सोनकांबळे (वय २५ वर्षे, रा. ता. देगलूर, जि. नांदेड) याला कलम ३०२, भा. दं. वि. अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व 2000 रुपये दंडांची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १ वर्षांचा सश्रम कारावास व कलम ४९८-अ, भा.दं.वि. अंतर्गत ३ वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
काय आहे घटना - घटनेची थोडक्यात माहिती अशी की, बाबु पि. निवृत्ती घोडके (वय ४५ वर्षे, जि. नांदेड) यांची मुलगी दीक्षा हिचे लग्न गंगाराम सोनकांबळे (रा. आंबेडकर नगर देगलुर) यांचा छोटा मुलगा यादु उर्फ यादव सोबत १० मे, 2017 रोजी रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. लग्नामध्ये हुंडा म्हणून रु १ लाख ५० हजार, एक मोटारसाईकल, पाच ग्राम सोन्याची अंगठी व संसार उपयोगी साहित्य देण्याचे ठरले होते; परंतु लग्नामध्ये ठरलेल्या हुंड्यातील रु ५० हजार व मोटारसायकल देण्याचे राहिले होते. दोषी पतीने ३० मार्च २०१८ रोजी दीक्षा हिला पतीसह सासरच्या मंडळींनी ५० हजार रुपये हुंडा व मोटारसायकल आणण्यासाठी शिवीगाळ व बेदम मारहाण केली होती. त्यानंतरही सासरचे लोक वारंवार दर चार, आठ दिवसाला हुंड्यातील राहिलेल्या मुद्देमालासाठी दीक्षाला मारहाण करायचे.
'या' आधारावर ठोठावली शिक्षा : १५ सप्टेंबर, 2018 रोजी दुपारी पतीने दीक्षाचा खून केला. मयत दीक्षा हिचे वडील बाबु पि. निवृत्ती घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध कलम ३०२, ३०४-ब, ४९८-अ, ३४ भा.दं.वि. नुसार देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पो. निरीक्षक प्रल्हाद भानुदास गिते यांनी पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. घटनेप्रकरणी एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करून तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी १६ ऑगस्ट २०२३ रोजी शिक्षा ठोठावली.
प्रकरणात यांची महत्त्वाची भूमिका : सरकातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. बी. कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणात देगलूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव गंगाराम पाटील यांनी सहकार्य केले.
हेही वाचा: