नांदेड - ग्रामीण भागात पशुधनावर आवश्यक ते औषधोपचार करता यावेत यासाठी खोड्यांची नितांत गरज असते. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये खोड्यांची उपलब्धता नसल्याने पशुधनावर उपचार करतांना जनावरांसह शेतकरी व डॉक्टरांनाही त्याचा त्रास व्हायचा. पशुवैद्यकिय उपचारातील ही महत्वाची गरज ओळखून जिल्ह्यात “गाव तेथे खोडा” या उपक्रमांतर्गत 546 गावांमध्ये खोड्यांच्या योजनेचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पशुधनासाठी वैद्यकिय सुविधा...!
या योजनेमुळे आता प्रत्येक गावांमध्ये जनावरांच्या विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या जातील. यात लसीकरण, गर्भ तपासणी, वंधत्व तपासणी, रोगनिदान औषधोपचार शक्य होईल. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने मानव विकास कार्यक्रमातर्गंत 9 तालुक्यात ही योजना राबविली जात आहे.
पशुवैद्यकीय सेवा पुरवितांना जनावरे नियंत्रित करण्यासाठी खोड्याचा वापर...!
पशुवैद्यकीय सेवा पुरवितांना जनावरे नियंत्रित करण्यासाठी खोडयाचा वापर होतो. गाभण जनावरे आणि दुधातील जनावरे यांना लसीकरण, आरोग्य तपासणी, रोग निदान व उपचार करणे सोयीचे होते. पर्यायाने पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. लहान वासरे, भाकड जनावरे व बैल यांना आरोग्य सेवा मिळाल्यामूळे त्यांचे आरोग्य आबादीत बैलाच्या मदतीने शेतीची कामे करता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपयोग होतो, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बोधनकर यांनी सांगितले.