कंधार (नांदेड)- अतिवृष्टीचा मार बसलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. तो शब्द ठाकरे सरकारने पाळला आहे. कंधार तालुक्यात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी २० कोटी ७६ लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले होते. मूग, उडीद, सोयाबीनसह इतर पिके पूर्णतः नष्ट झाली. या पावसाने खरीप हंगामातील ४१ हजार ५३६ हेक्टर पिकांचे नुकसान केले. महसूल, कृषी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या पंचनाम्यातून नुकसानीचे चित्र समोर आले होते. या नुकसानीचा फटका ६१ हजार ४२५ शेतकऱ्यांना बसला होता. अनुदानाचा पहिल्या टप्प्यात २० कोटी ७६ लाख ७९ हजार ९३३ रुपये प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
परतीच्या पावसाचा फटका -
यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके जोमात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, परतीच्या पावसाने हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल कृषी, पंचायत यांच्या संयुक्त पथकांनी पंचनामे केले. ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते.
खरीप हंगामातील या पिकांचे झाले नुकसान-
सोयाबीन- २३हजार १४६ हेक्टर
कापूस- १२ हजार ३५८ हेक्टर
ज्वारी- ५ हजार ६३२ हेक्टर,
तूर- २०० हेक्टर
इतर पिके- २०० हेक्टर
एकूण ४१ हजार ५३६ हेक्टर पिके बाधित झाली.
अतिवष्टीचा १२३ गावांना फटका -
अतिवृष्टीचा फटका १२३ गावांतील ६१ हजार ४२५ शेतकऱ्यांना बसला. उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीक नुकसानीचे पंचनामे तहसीलदार यांनी संबधितांना करण्यास सांगितले. यंत्रणेने पंचनामे केल्यानंतर तहसीलदार यांनी नुकसानीची माहिती वरिष्ठ पातळीवर पाठविली. तालुक्यातील बाधित पिकांसाठी शेतकऱ्यांना ४१ कोटी ५३ लाख ६० हजार असे १० हजार रु. प्रति हेक्टर प्रमाणे लागते. आता मदतीचे पहिला हप्ता २० कोटी ७६ लाख ७९ हजार ९३३ रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.
हेही वाचा- शेतकरी प्रश्न : आमदार रवी राणांचे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन