नांदेड - बिलोली जवळील पिंपळगाव (कुं.) येथे एका मृत मुलाच्या पालकांनी गावातील एका मुलाला आणि एका प्रौढ व्यक्तीला उकळत्या तेलात हात घालण्यास भाग पाडले होते. या दोघांनाही नांदेडहून पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात येणार आहे. दरम्यान, याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती पथकाने मंगळवारी पिंपळगाव येथे भेट दिली आहे.
बिलोली तालुक्यातील पिंपळगाव (कुं.) येथे ३१ ऑगस्ट रोजी सकाळी वीस ते पंचवीस नागरिकांसमोर मुलाच्या मित्रांना त्याच्या मृत्यू बाबत जाब विचारण्यात आला. मित्रांनी खरे बोलावे म्हणून एका मुलाचा आणि एका प्रौढ व्यक्तीचे हात उकळत्या तेलात बुडविण्याची अघोरी घटना घडली होती. एका भोंदू बाबाच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेपोटी हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. राम फकीरा जाधव, कांताबाई राम जाधव आणि लक्ष्मण फकीरा जाधव यांच्या परिवारातील मुलगा संजू राम जाधव हा वीस दिवसांपूर्वी मेंढ्या चारण्यासाठी गेला होता. दरम्यानस, जंगलातील खदानीत पडून मरण पावला होता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या बिरू भूमा शेरगिरे व संतोष बाबू हरनाळे या दोघांना राम जाधव यांनी घरी बेलावून घेतले. एका भोंदू बाबाच्या सांगण्यावरून दोन मुलांना तुम्ही खरे बोलत असाल तर उकळत्या तेलात हात घाला तुमचे हात भाजणार नाहीत, असे सांगितले. तसेच त्यांना मारहाण करुन तेलात हात बुडवायला लावले. यात दोघांचेही हात गंभीररित्या भाजले. त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांचे हात गंभीर भाजल्यामुळे निकामी झाल्याचे सांगत त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकाने नांदेड येथील रुग्णालयाला भेट दिली व संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी सोमवारी कुंडलवाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनेची संपूर्ण माहिती घेतली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक पाठवल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी दिली.