नांदेड - शहरातील श्यामनगर, बाबानगर भागात असलेल्या शिकवणी वर्गाच्या कार्यालयात बुधवारी आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली.
शहरातील श्यामनगर भागात वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी पूर्वतयारीचे वर्ग घेतले जातात. त्यामध्ये विविध विषयांच्या प्राध्यापकांनी भाग्यनगर चौरस्ता ते शंकरराव चव्हाण पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठया इमारतींमध्ये शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये शुल्क घेतले जाते. मात्र, संबंधित संचालक विद्यार्थी संख्या कमी दाखवून तसेच कमी शुल्क दाखवून आयकराची चोरी करतात.
आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर बुधवारी शहरातील श्यामनगर भागात असलेल्या शिकवणी वर्गाच्या कार्यालयात जावून तपासणी केली. आयकर खात्याचे अधिकारी आल्याची माहिती मिळताच काही क्लासेसच्या संचालकांनी बुधवारी वर्गाला सुट्टी देवून कार्यालय बंद ठेवली. रात्री उशीरापर्यंत ही तपासणी चालू होती.