नांदेड - जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी समाजसेवेचे व्रत हाती बांधले आहे. जिल्ह्यातील जनता माझी व मी जनतेचा हे त्यांच्या राजकारणाचे ब्रीद आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या गरीब माणसांना कुठलाही गवगवा न करता धान्याचे कीट वाटण्याचे काम काँग्रेस पक्षातर्फे अविरतपणे चालू आहे. आम्ही गरीब माणसांना धान्य वाटतो तर तुम्ही मात्र जिल्ह्यातील जनतेला दारु वाटून अनेकांचे संसार रस्त्यावर आणले आहेत, असा सणसणीत टोला काँग्रेसचे कंधारचे माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना आज येथे लगावला.
भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी टीका केल्यानंतर मोठे पद उपभोगलेल्या माणसाने नशिबाने मिळालेल्या लहान पदाची प्रतिमादेखील जपण्याचे काम केले पाहिजे. मात्र, नांदेडमध्ये असे होताना दिसत नाही. सहा महिन्यात जिल्ह्यात किती नवी कामे मंजूर करुन निधी आणला, त्याचा हिशोब दिला पाहिजे. यासह अनेक विषयांसंदर्भात चव्हाण यांच्यावर खास चिखलीकर यांनी टीका केली होती.
त्यानंतर प्रसिद्धीपत्रक काढून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंद नळगे यांनी त्यास प्रत्युत्तर देत चिखलीकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील जनता भयभीत झाली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले हजारो नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा वेळी त्यांना मदत करण्याचे काम पालकमंत्री अशोक चव्हाण अहोरात्र करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कोरोनाचा प्रादूर्भाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वारंवार बैठका घेणे, राज्य शासनाशी समन्वय साधणे हे काम करीत असतांनाच जिल्ह्यातील गरीब माणसाला धान्याच्या माध्यमातून मदत करुन चव्हाण यांनी एक वेगळी ओळख संपूर्ण राज्यात निर्माण केली आहे. अनेक तालुक्यांच्या ठिकाणी जावून तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेतांनाच तेथील गरिबांना काँग्रेस पक्षातर्फे धान्याचे वाटप करण्याचे काम पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
हे सर्व काम करीत असतांना त्यांनी कधीच पक्षीय राजकारण केले नाही. ज्या तालुक्यात त्यांच्या बैठका झाल्या त्या ठिकाणी त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा बैठकीस बोलाविले. नायगावचे आ. राजेश पवार, मुखेडचे आमदार तुषार राठोड यांची तालुकानिहाय बैठकीमध्ये उपस्थिती ही नेमकी तेच दर्शविते. गरिबांना मदत करतांना त्याचा गवगवा करणारी काँग्रेस पक्षाची संस्कृती नाही.
चव्हाण यांनी जिल्ह्यामध्ये साखर उद्योग मोठ्या प्रमाणात वाढविला. शैक्षणिक संस्था निटनेटकेपणाने चालवितात. यातून जिल्ह्यातील हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. शेतकर्यांना ऊसाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे. याउलट खा.चिखलीकर यांनी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील बंद पडलेली दारुचे दुकाने नांदेड जिल्ह्यात आणली. हजारो लोकांना व्यसनाधिन केले. लॉकडाऊनच्या काळात दारु वाटण्याचे पाप खा. चिखलीकर यांचे आहे. लॉकडाऊनसारख्या कठीण परिस्थितीत गरज नसतांना वारंवार आरोप करुन मी मोठा असल्याचे सिद्ध करण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न असल्याचा आरोप अरविंद नळगे यांनी केला आहे.