नांदेड - जिल्ह्यात आठ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यंदाच्या तापमानाचा उच्चांक नोंदवण्यात आला. सोमवारी नांदेडचे तापमान सर्वाधिक ४५.०५ अंशावर पोहोचले होते . त्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. बाजारपेठ उघडी असताना रस्त्यावरही उन्हामुळे तुरळक गर्दी होती .
मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसानेही अधूनमधून हजेरी लावली आहे. त्यामुळे तापमानात फारशी वाढ झाली नव्हती. त्यात २४ मार्चपासून कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकही घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने कुलर आणि आहे.
वातानुकूलीत यंत्र लावण्याचेही टाळण्यात आले. परंतु , मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुलरसह वातानुकूलीत यंत्राचा वापरही वाढला आहे. रविवारी नांदेडचा पारा ४५ अंशाच्या पुढे होता. २५ मे रोजी तापमान ४५.०५ अंशावर गेले होते. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती.
जिल्ह्यात गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता काही अंशी मिटली आहे; पण त्याचवेळी मुखेड, लोहा, कंधार, नायगाव या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा मे अखेरीस बसत आहेत. नांदेड शहरालाही दोन दिवसांआड पाणी मिळत आहे. गतवर्षी १२ दिवसांआड पाणी मिळत होते. २०१७ मध्ये जिल्ह्यात ६७ टक्के तर २०१८ मध्ये ८१ टक्के पर्जन्यमान झाले होते. तर गतवर्षी २०१९ मध्ये १०६ टक्के पाऊस झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. कोरोना संकट काळात ही एक समाधानाची बाब झाली आहे.
नांदेडमध्ये कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही अंशी व्यवहारात सूट दिली आहे. त्यामुळे व्यवहार सुरू असले तरीही वाढत्या तापमानाचा फटका या व्यवहारांना बसत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात व्यवहाराला परवानगी दिली आहे; पण उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.